1995 मध्ये अयोध्यानगर वार्ड अस्तित्वात आला. सिडको-हडको परिसर हा शिवसेना -भाजप विचारांचा बोलकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात स्वत:चा झेंडा रोवणारा आणि तो कायम फडकत ठेवणारा एकमेव राजकीय नेता म्हणजे काशिनाथ कोकाटे. अयोध्यानगर हा वार्ड 1995, 2000 व 2010 अशा तीन वेळा सर्वसाधारण (पुरूष) होता आणि या तिन्ही वेळेस काशीनाथ कोकाट यांनी अपक्ष लढून एकतर्फी विजय मिळविलेला आहे. 2005 मध्ये तर अयोध्यानगर वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी लगतच्या एन-8 गणेशनगर वार्डातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि शिवसेनेच्या त्यावेळच्या नगरसेवक उमेदवाराला एक हजार मताच्या फरकाने हरविले. 2005 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात ते आले आणि मुंडे यांच्यामुळेच त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय सरस कामगिरी केली आणि त्याच कामाच्या जोरावर ते मनपाच्या राजकारणात आजही ते स्वत:चा दबदबा ठेऊन आहेत.
काशीनाथ कोकाटे यांचा उदय झाला कामगार क्षेत्रातून. ग्रिव्हनी मधून नोकरीच्या निमित्ताने कोकाटे 1978 मध्ये सिडको एन-7 भागात आले. कामगार प्रतिनिधी झाले आणि संपकाळात त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याने त्यांना अवघ्या दोन -अडीच वर्षात नोकरी गमवावी लागली. त्यांची नोकरी गेली आणि जीवनाची दिशाच बदलून गेली. कामगारांच्या हट्टापायी नोकरी गेली तरी येथेच राहण्याचा निश्चय त्यांनी केला आणि संपूर्ण सिडको-हडको परिसरातील समस्यांना हात घालीत स्वत:चे नेतृत्व सिडकोनागरीत विकसित केले.
कृती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी फार महत्वाची आहे. ऑडशेप प्लॉट, मालमत्ता कर, संदर्भात त्यांनी नागरिकांना फार मोठा दिलासा मिळवून दिला. उच्य न्यायालयाच्या आदेशाने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला थेट विरोध करून अनेक नागरिकांचे घर वाचविण्याचे पुण्य त्यांना मिळाले. सिडको- हडकोतील नवीन तरूण नेत्यांचे ते विद्यापीठ समजले जातात. कोकाटे तर काँग्रेसच्या विचाराचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहरअध्यक्षही होते परंतू सामाजिक कार्यात राजकारण कधीही येऊ दिले नाही. त्यांचे शार्गिद आज प्रत्येक मनात बघायला मिळतात. मनपाच्या राजकारणात सलग 20 वर्षे राहूनही अंगावर एवढासाही शिंतोडा न उडालेला हा एकमेव नेता समजला जातो. यावेळी अयोध्यानगर हा वार्ड पून्हा एकदा सर्वसाधारण झाल्यामुळे काशीनाथ कोकाटे यांनी पुन्हा एकदा या वार्डाचे नेतृत्व करावे अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या चार - पाच वर्षापासून पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर लगतच्या गणेशनगर, पवननगर, श्रीकृष्णनगर या वार्डात पक्षाला फार मोठा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.
फडणवीसांकडून कौतुक
2005 मध्ये एन-8 गणेशनगरचे नगरसेवक असतांना कोकाटे यांनी हौसिंग सोसायट्यामध्ये प्रचंड काम केले. सर्व सोसायट्यामध्ये रस्ते तयार केले. तसेच पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वतंत्र पाण्याची टाकी एन-8 भागात बांधून घेतली. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते 1 मे 2005 ला टाकीचा लोकार्पण सोहळा झाला. योगायोगाने त्यावेळेस जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले देवेंद्र फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित राहिले. वार्डातील पाणी समस्या सोडविण्याबद्दल त्यांनी कोकाटे यांचे तोंडभरून कौतूक केले होते.